आज विज्ञानाची घोडदौड प्रचंड गतीने चाललेली असल्याने त्याच्याशी जोडलेले मानवी जीवनही अतिशय गतीमान झालेले आहे. या गतिमानतेमुळे मानवी जीवनात अस्थिरता वाढलेली आहे. आधीच चंचल असलेले मन, गती व प्रगती बरोबर अधिकच चंचल बनले आहे. त्यामुळे आता सर्वत्र मनाच्या स्थिरतेची व शांतीची गरज निर्माण झालेली आहे. जगभर मन: काय शांतीचा शोध चालू आहे. ही मन:शांती योग साधनेतून मिळू शकते. हे लक्षात आल्यामुळे सारेजग योगाच्या मागे लागलेत.
विज्ञानामुळे माणसाला भौतिक समृध्दी आली, माणसाचे त्रास, कष्ट कमी झाले, हे जरी खरे आहे पण माणूस सुखी झाला का ? याचे उत्तर हो असे देता येणार नाही. वैज्ञानिक प्रगतीबरोबर वाढत जाणारे ताण तणाव व यांतून निर्माण होणाऱ्या व्याधी ह्यातर दुःख देणाऱ्याच आहे. अशा व्याधींना मनोकायिक विकार समजले जाते. अशा विकारात हृदयविकार, मधुमेह, उच्चरक्तदाब, अॅसिडीटी, अल्सर असे अनेक विकार अंतर्भूत आहेत. तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, प्रत्येक व्याधी काही प्रमाणात मनोकायीक असते. म्हणजे व्याधीला काही प्रमाणात मन कारणीभूत असते. याशिवाय मनोदौर्बल्य, नैराश्य व ततसम् विकार तर आता खूपच मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. या सर्वांवर उपचार उपलब्ध नाहीत. कारण आधुनिक वैद्यकाला मन सापडलेले नाही. तर त्यावर उपचार कसे करता येणार ? या गंभीर समस्येला खंबीरपणे तोंड देण्याकरिता योग साधना निश्चित उपयोगी पडते. केवळ मनस्वास्थ्यच नाही तर मनाचे नियंत्रण करण्याकरिता योग आहे. योगवासिष्ठ्य या ग्रंथात योगाची व्याख्या करताना वसिष्ठ ऋषी सांगतात योग: मनः प्रशमन उपाय: ॥
अर्थ- मनावर प्रयत्नपूर्वक (प्रकर्षाने) नियंत्रण करण्याचा उपाय म्हणजे योग.मन म्हणजे निश्चित काय आहे ? त्याचे स्वरुप काय आहे ? त्याची कार्ये कोणती आहेत ? मनाचा स्वभाव काय आहे ? त्याचे गुणधर्म काय आहे ? त्याची क्षमता काय आहे? अशा अनेक पातळ्यांवरुन मन समजावून घेण्याचा प्रयत्न केला की नंतर त्यावरील नियंत्रणाचा विचार करता येईल. खरं म्हणजे मनाचा विचार करण्याचे कामही माझे व तुमचेच मन करणार आहे.
मन म्हणजे काय ? ते कोठे आहे ? त्याचे स्वरुप काय आहे ? या प्रश्नांची आजही फार कोणाला उत्तरे देता आली नाही. वस्तूनिष्ठ विज्ञानाला तर मनाच्या संदर्भात काहीही सांगता आलेले नाही. कारण मन अमूर्त आहे. मन दिसत नाही व प्रयोग शाळेत यंत्राच्या सहाय्याने सुध्दा त्याचा पत्ता लागत नाही. परंतु मन सापडत नाही, दिसत नाही, म्हणून त्याचे, अस्तित्व आपण नाकारु शकत नाही. पण त्यामुळे मन आहे हे निश्चित ! शिवाय मन म्हणजे प्रत्यक्षा दिसत नसले तरी त्याचे परिणाम क्षणोक्षणी अनुभवायला मिळतात. बरेच वेळेला शरिरापेक्षा मन बलवान व प्रभावी असल्याचे जाणवते. अनेक वेळा मन शरीरावर नियंत्रण करीत असल्याचेही समजते. मन हे अनाकलनीय गुढ, पण सामर्थ्यशाली आहे. अशा मनाचा अभ्यास फार पुरातन काळापासून सुरु आहे. पाश्चिमात्य परंपरेतील मानसशास्त्र हे मनाचा अभ्यास करण्याकरिता निर्माण केलेले शास्त्र आहे. भारतीय परंपरेतून मनाचा अभ्यास वेदकाळापासून केलेला आहे. वेदकाळ सहा ते सात हजार वर्षापूर्वीचा मानला जातो. ऋग्वेदात साधारणत: १५० वेळेला मन:चा उल्लेख झालेला आहे. अनेक उपनिषदात मनाचा उल्लेख आहे. त्याकाळापासून तत्ववेत्त्यांना मनाची महती व मनाचे सामर्थ्यही माहिती होते. २५०० वर्षापूर्वी रचलेल्या पातंजल योगसुत्रातून मनावर नियंत्रण आणण्याच्या प्रक्रिया सांगितलेल्या आहेत. पातंजल योग दर्शनाला तर भारतीय मानसशास्त्र मानले जाते. यातील प्रक्रियांच्या साधनेमुळे मनावर नियंत्रण आणता येते असेही अनुभव आले आहेत. म्हणूनच पाश्चात्य विद्वानही आज योगाचा सखोल अभ्यास करीत आहे.
मनाचा अभ्यास करणाऱ्यांनी मनाची व्याख्या करण्याचाही प्रयत्न केला आहे. पाश्चात्य वैद्यकात मनाची व्याख्या करताना मनाचे अस्तित्व स्पष्ट केले आहे. ती व्याख्या अशी आहे - Mind is not a Matter or Energy it is a Functional think matter म्हणजे स्थूल जे पंच ज्ञानेंद्रियांना जाणवते ते अर्थात मन पंचेद्रियांना जाणवत नाही. याच बरोबर मन ही शक्तीही नाही असे या व्याख्येत सांगितले आहे. मन म्हणजे स्थूल नाही व सुक्ष्मही नाही तर मन हे स्थूल व सुक्ष्माच्याही पलीकडे आहे. ती एक कार्यकरणारी वस्तू आहे. म्हणजे स्थूल व सुक्ष्म नसूनही मन काहीतरी कार्य करीत असते या व्याख्येमुळे मनाचा उलगडा होण्या ऐवजी गुंतागुंत वाढलेली आहे. मन म्हणजेच स्थूल व सुक्ष्म नाही हे कळते पण हे काय आहे हे कळत नाही. Funatinal thing म्हणजे काय ? हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. भारतीय वैद्यक म्हणजे आयुर्वेद ! यात मनाची व्याख्या दिलेली आहे. ती अशी मूर्त अशा इंद्रियांना अमूर्त अशा जिवात्म्यांशी जोडणारा दुवा म्हणजे मन, आयुर्वेद म्हणजे भारतीय परंपरेतील शास्त्र असल्यामुळे त्याला भारतीय तत्त्वज्ञानाची जोड दिलेली आहे. भारतीय तत्त्वज्ञानात मानवी जीवनाचा खूपच सखोल विचार झालेला आहे. हाडामासांनी बनलेले शरीर म्हणजे स्थूल शरीर. या शरीराच्या प्रत्येक हालचालीमागे असणारी प्रेरणा म्हणजे प्राण आहे. प्राणाचे कारण असलेला जीवात्माच शरीराचे पूर्ण नियंत्रण करीत असतो. व तोच सर्व सुख दुःखे शरीराच्या माध्यमातून भोगत असतो. हा जीवात्मा अदृष्य आहे, अमूर्त आहे. तो दिसत नाही पण तो आहे. अशा अमूर्त जीवात्म्याला मूर्त अशा इंद्रियांशी जोडण्याचे कार्य मन करते. निरनिराळ्या विकृतींवर उपचार करणारे आणखी एक शास्त्र म्हणजे होमिओपॅथी. या शास्त्रानेही मनाची व्याख्या केली आहे ती अशी, मन हे मेंदू व मज्जासंस्थेतील शरीर व आचार विचारांवर नियंत्रण ठेवते. या ठिकाणी मनाची व्याख्या करण्याऐवजी मनाचे प्रमुख कार्यच सांगितलेले आहे. मन हे एकच असून त्याचे कार्याच्या दृष्टीने ३ भाग मानलेले आहेत.भावना, बुध्दी व सुप्त मन या तीन भागांच्या कार्यपध्दतीतूनच मनाचे कार्य लक्षात येते. मनात आलेल्या विचारांचा परिणाम मेंदू व मञ्जासंस्थेवर होतो व तो पुढे शरीरावयांवरही होतो. म्हणजेच शरीराच्या अवयवांचे नियंत्रण मज्जासंस्थाच करते. पण मज्जासंस्थेचे नियंत्रण मन करते असे या व्याख्येत सांगितले आहे.
योग व मन:स्वास्थ्ये
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा